
National Working President of Akhil Veerashaiva Lingayat Mahasangh Dr. Vijay Jangam (Swami)
वीरशैव लिंगायत समाज कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधता येणार नाही* महासंघाची रोखठोक भूमिका!
मुंबई (वार्ताहर): २०२४ ची विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून आता सर्वच राजकीय पक्ष विविध समाज आणि जनतेला खुश करण्यासाठी आपले जाहीरनामा, वचननामा प्रकाशित करून आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहेत. अनेक समाज आपल्या विविध मागण्या शासन दरबारीं मांडून आहेत. यामध्ये वीरशैव लिंगायत समाज ही आपल्या अनेक मागण्यासाठी गेली कित्येक वर्ष पाठपुरावा करीत असून त्यांची पूर्ततेची अनिश्चितता आणि अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लागले नसल्याने वीरशैव लिंगायत समाज नाराज झाला आहे. यामुळेच समाजाने ह्या निवडणुकीत काय भूमिका घ्यायची याकरिता अखिल वीरशैव लिंगायत महासंघ निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रीय कार्यकरीणीच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यासाठी दिशा ठरवली आहे.
अखिल वीरशैव लिंगायत महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॅा. विजय जंगम(स्वामी) यांनी समाजाला आवाहन करणारे पत्रक, संदेश जारी करून महासंघाची भूमिका मांडली आहे. यामध्ये डॉ विजय स्वामी म्हणतात की आगामी विधानसभा निवडणूक -२०२४ लक्षात घेता आपल्याला महासंघातर्फे सर्वच राजकीय पक्षांकडे विशेष मागणी करणे आवश्यक आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीही वीरशैव लिंगायत समाजाला विद्यमान सरकारने वाटाण्याच्या अक्षता दिल्यात व सर्वच निवेदनांना केराची टोपली दाखवली. ही आपणा सर्वांसाठी संतापजनक बाब आहे. आचारसंहीता लागू होण्यापूर्वी विद्यमान सरकारने जवळपास ८० पेक्षा जास्त शासननिर्णय लागू केलेत मात्र यावेळी वीरशैव लिंगायत समाजाच्या एकाही मागणीचा विचार केला गेला नाही. सुरुवातीपासूनच महासंघाची स्पष्ट व ठाम भूमिका आहे की कोणत्याही राजकीय पक्षाला थेट पाठींबा देता येणार नाही. समाजाला गृहीत धरुन एकगठ्ठा मतांचा घोडेबाजार खपवून घेतला जाणार नाही, ही गोष्ट महासंघाच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. व तशी स्पष्ट सूचना आपापल्या विभागातील राजकीय पक्षांना देणे आवश्यक आहे. वीरशैव लिंगायत समाज हा कधीही कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधता येणार नाही आणि महासंघ हे चालू देणार नाही.
आगामी निवडणूकीत जो राजकीय पक्ष आपल्या जाहीरनाम्यात/ वचननाम्यात स्पष्टपणे वीरशैव लिंगायत समाजाबाबत असलेले प्रश्न मार्गी लावण्याबाबत वचन देईल त्या पक्षाला त्यांच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करुन समाजाला आवाहन करता येईल(कुठल्याही प्रकारची मतदानाची हमी देता येणार नाही). महासंघाचा जो कोणी पदाधिकारी किंवा कार्यकर्ता समाजाला गृहीत धरून जर कुठल्याही राजकीय पक्षासोबत हातमिळवणी करुन मतदानाचा व्यवहार करेल त्याला तातडीने महासंघातून बडतर्फ करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
महासंघातर्फे वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख मागण्या अशा आहेत.१. वीरशैव लिंगायत हे केवळ हिंदूच आहेत, त्यांना स्वतंत्र धर्म मान्यता देणार नाही ही ठाम भूमिका. २. वीरशैव लिंगायत समाजातील सर्वच जाती / पोटजातीतील OBC आरक्षणाचा मुद्दा तातडीने निकाली काढावा. ३. वीरशैव लिंगायत समाजातील इतर मागास वर्गीय व SC/ST याबाबत संभ्रम असून शासनाने सुधारीत पत्रक काढून ज्या समाजबांधवांकडे जे जातप्रमाणपत्र उपलब्ध आहे ते कायम करुन द्यावे. ४. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त दर्जा द्यावा व भरीव निधी द्यावा. ५. केंद्र सरकारकडून वीरशैव लिंगायत समाजासाठी विशेष निधीसाठी मागणी. ६. मुंबई येथे आद्य जगद्गुरु रेणूकाचार्य,महात्मा बसवेश्वर, संतशिरोमणी मन्मथ स्वामी महाराज, अक्का महादेवी, राणी चेन्नम्मा, संत लक्ष्मण महाराज आदी महापुरुषांचे भव्य संयुक्त स्मारक या मागण्या आपल्या वजननाम्यात द्याव्यात असे अखिल वीरशैव लिंगायत महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॅा. विजय जंगम(स्वामी) यांनी मागणी केली आहे.
Be the first to comment on "वीरशैव लिंगायत समाजाचे नेते डॅा. विजय जंगम(स्वामी) यांचा सरकारला इशारा व वीरशैव लिंगायत समाजाला आवाहन!"