मतदान केंद्रांचे व्यवस्थित सुसूत्रीकरण करून आवश्यक सोयीसुविधा पुरविण्याचे निर्देश -अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी

Dr. Ashwini Joshi, Additional District Election Officer and Additional BMC Commissioner, MCGB

मुंबई शहर विभागातील मतदान केंद्रांसंदर्भातील कामकाजाचा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी घेतला आढावा• निवडणूक कर्मचाऱ्यांचे योग्य व्यवस्थापन करून योग्यप्रकारे काम करून घेण्याच्याही सूचना

मुंबई ०४ ऑक्टोबर २०२४ (GPN): आगामी विधानसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर विभागातील वडाळा, शीव (सायन), धारावी, माहीम या मतदारसंघांतील मतदान केंद्रांसंदर्भात करण्यात आलेले नियोजन, पूर्वतयारी आदींचा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी महानगरपालिका मुख्यालयात (दिनांक ०४ ऑक्टोबर २०२४) आढावा घेतला.

विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) श्री. विजय बालमवार, निवडणूक समन्वय अधिकारी श्रीमती फरोघ मुकादम, बृहन्मुंबई महानगरपालिका उप आयुक्त (परिमंडळ-२) श्री. प्रशांत सपकाळे तसेच विविध प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त आणि संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बृहन्मुंबई क्षेत्रात (मुंबई शहर जिल्हा आणि उपनगर जिल्हा) सध्या निवडणूक पूर्वतयारी सुरू आहे. याच धर्तीवर मुंबई शहर विभागातील पूर्वतयारींचा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी वडाळा, शीव (सायन), धारावी, माहीम या मतदारसंघांशी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

मुंबईतील मतदार केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आलेले आहे. सर्व मतदार केंद्रांच्या ठिकाणी विविध प्रकारच्या सोयीसुविधा योग्यप्रकारे देण्यासंदर्भात नियोजन करण्यात यावे. मतदारांनी मतदार यादीत नोंदणी करण्यासाठी, मतदार संघात बदल करण्यासाठी किंवा नाव कमी करण्यासाठी दिलेल्या अर्जांचा लवकरात लवकर निपटारा करावा. मतदान नोंदणी करणे, मतदानाचा हक्क बजावणे तसेच ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रांबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे सुसूत्रपणे नियोजन करावे आणि त्यांच्याकडून विहित वेळेत कामे पूर्ण होतील, हे सुनिश्चित करावे, असे निर्देश श्रीमती जोशी यांनी या बैठकीत दिले. तसेच, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन सुसूत्रीकरणानंतर मतदान केंद्रांमध्ये झालेल्या बदलांविषयी माहिती द्यावी, मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आवाहन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

दरम्यान, विविध मतदारसंघांमध्ये कार्यरत निवडणूक अधिकाऱ्यांकडून पूर्वतयारी तसेच कामकाजाबाबत असलेल्या अडचणी आणि त्यांच्या सूचनाही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती जोशी यांनी यावेळी जाणून घेतल्या.

*****
(जसंवि/४०५)

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "मतदान केंद्रांचे व्यवस्थित सुसूत्रीकरण करून आवश्यक सोयीसुविधा पुरविण्याचे निर्देश -अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी"

Leave a comment

Your email address will not be published.


*