
NCP State General Secretary and Treasurer MLA Shivajirao Garje – File Photo GPN
Punish the miscreants under Cyber Crime who deliberately spread fake news by taking screenshots of Deputy Chief Minister Ajit (dada) Pawar’s Facebook page and do misuse- Shivaji Rao Garje
मुंबई दि. १९ सप्टेंबर (GPN)- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या फेसबुक पेजचे खोटे स्क्रीनशॉट काढून समाजमाध्यमांवर जाणीवपूर्वक फेक न्यूज पसरविणाऱ्यांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे नोंद करुन संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अधिकृत फेसबुकचे खोटे स्क्रीनशॉट काढून समाजमाध्यमांवर जाणीवपूर्वक प्रतिमा हनन करण्याचा प्रकार सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या फेसबुक पेजबाबतचे ते वृत्त निराधार, धादांत खोटे, खोडसाळपणाचे आहे असेही शिवाजीराव गर्जे यांनी म्हटले आहे.
गेल्या दीड महिन्यापासून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून ते समाजातील विविध घटकांशी संवाद साधत आहेत. तसेच ‘लाडकी बहीण योजने’सह महायुती सरकारच्या विविध योजनांची माहिती चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या जनसन्मान यात्रेला राज्यभरात भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे काही जणांना पोटशुळ उठला असून ते जाणीवपूर्वक अजितदादा पवार यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच प्रकार आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अधिकृत फेसबुक पेजबाबत घडला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या फेसबुक पेजचे खोटे स्क्रीनशॉट काढून ते समाज माध्यमांमधून फिरवण्यात येत आहेत. तसेच या प्रकरणाची कोणतीही खातरजमा न करता काही इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियावरील माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. माध्यमांनी प्रत्येक गोष्टीची खातरजमा करून वृत्त प्रसिद्ध करणे अपेक्षित होते असेही शिवाजीराव गर्जे यांनी म्हटले आहे.
Be the first to comment on "उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या फेसबुक पेजचे स्क्रीनशॉट काढून जाणीवपूर्वक फेक न्युज पसरवणाऱ्यांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल करा – शिवाजीराव गर्जे"