अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री आमदार नवाब मलिक आणि त्यांची मुलगी सना मलिक शेख यांच्या प्रयत्नांना ४० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर यश ; कब्रस्तान, स्मशानभूमी, शाळा आणि हॉस्पिटलसारख्या महत्त्वाच्या विकासकामांना मिळाली मंजुरी

मुंबई दि. २६ ऑगस्ट (GPN) – अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात मुंबई महानगरपालिकेने ४० वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आणि आमदार नवाब मलिक आणि त्यांची मुलगी सना मलिक शेख यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर महत्वपूर्ण अशा विकासकामांना मंजूरी दिली आहे.

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात आधुनिक कब्रस्तान, स्मशानभूमी, उद्यान, खेळाचे मैदान, नगरपालिकेची शाळा, हॉस्पिटल आणि ४४ फुटाचा रस्ता यांचा यामध्ये समावेश आहे. ही सर्व विकासकामे अणुशक्तीनगरच्या प्रगती व जनतेच्या नागरी सुविधा सुधारण्यासाठी होणार आहेच शिवाय जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत अशी माहिती आमदार नवाब मलिक यांनी दिली.

मला या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे त्या संधीतून मतदारसंघाचा विकास आणि जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या प्रयत्नांमुळे आज ४० वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मुंबई महानगरपालिकेने विकासकामांना मंजुरी दिली आहे. हे करण्यासाठी सतत लोकांच्या कामांचा पाठपुरावा करावा लागला आहे.अणुशक्तीनगर मतदारसंघातील लोकांची अनेक वर्षाची ही मागणी होती. आता ही विकासकामे मार्गी लागत असल्याने लोकांना सुविधा मिळणार आहेच शिवाय इथला विकासही पूर्ण होणार आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

मंजूर झालेल्या कब्रस्तान व स्मशानभूमीमध्ये आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत. कारण त्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा सन्मान होईल. याशिवाय एक मोठे उद्यान, खेळाचे मैदान, नगरपालिकेची शाळा, हॉस्पिटल आणि सुमारे ४४ फुटाचा रस्तासुध्दा बनवला जाणार आहे. हा रस्ता भिकाजी दामाजी पाटील मार्ग ते भारतनगर झोपडपट्टीला जोडणारा असणार आहे. या विकासकामांचा उद्देश स्थानिक लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी आणि त्यांचा पाया मजबूत करण्यासाठी होणार आहे. हे विकासाचे पाऊल मतदारसंघाच्या भल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

१८ जुलै २०२१ मध्ये भारतनगर झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. त्यात १८ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. ही झोपडपट्टी जवळपास एक हेक्टर क्षेत्रात पसरलेली आहे. इथे जवळ जवळ २५ हजार लोक वास्तव्यास आहेत. या झोपडपट्टीकडे जाण्यासाठी फक्त ४ ते ५ मीटरचाच रस्ता आहे. जो एचपीसीएलच्या खाजगी जागेला जोडून आहे. त्यामुळे इथे काही दुर्घटना घडली तर त्याठिकाणी पोचण्यासाठी अडचणी निर्माण होतात. अणुशक्तीनगरचा आमदार म्हणून मी विकास योजना २०३४ मध्ये निष्कासित भाग ME१९ ची त्वरीत स्वीकारण्याची मागणी केली आहे. कारण भिकाजी दामाजी पाटील मार्गाला भारतनगर झोपडपट्टीला जोडण्यासाठी १३.४० मीटर रुंद पक्का रस्ता मुंबई महानगरपालिकेला लवकरात लवकर सुरू करता येईल असे नवाब मलिक यांनी सांगितले.

या विकास योजनेमध्ये आमदार नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक शेख यांचाही सक्रिय सहभाग दिसला आहे. सना मलिक शेख यांनी जनतेच्या विकासकामांना तातडीने मंजुरी दिल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेला धन्यवाद दिले आहेत शिवाय आमदार नवाब मलिक यांनी वारंवार मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभारही सना मलिक शेख यांनी मानले आहेत.

हे आधुनिक कब्रस्तान आणि स्मशानभूमी मुस्लिम, हिंदू लिंगायत, आणि ईसाई समाजाची सांस्कृतिक आणि धार्मिक आवश्यकता पूर्ण करणार आहे. हे कब्रस्तान आणि स्मशानभूमी १६,१४३.५३ वर्गमीटरच्या प्लॉटवर बनवण्यात येणार आहे.याशिवाय उद्यान हे ४४,८८१.८० वर्गमीटरच्या प्लॉटवर होणार आहे.याव्यतिरिक्त अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील मुलांसाठी ८,२४४.३५ वर्गमीटर प्लॉटवर एक नगरपालिकेची शाळा उभी राहणार आहे. याचबरोबर १३,६५९.३० वर्गमीटरवर खेळाचे मैदान बनवले जाणार आहे जे बाह्य खेळांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. या दोन्ही योजनांमधून शैक्षणिक व शारीरिक खेळांना प्राधान्य दिले जाणार आहे. यातून मुलांचा व तरुणांचा सर्वांगीण विकास होणार आहे. मतदारसंघातील लोकांसाठी आरोग्य सुविधा चांगल्या मिळण्यासाठी ८,४१५.६८ वर्ग मीटर प्लॉटवर एक अत्याधुनिक हॉस्पिटल बनवले जाणार आहे. याठिकाणीच ४४ फुटाचा पक्का रस्ता बनवण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे ये-जा करायला नागरिकांना सोयीचे पडणार आहेच शिवाय होणारी वाहतूककोंडी दूर होणार आहे असेही सना मलिक शेख यांनी स्पष्ट केले.

ही मंजूर झालेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत जेणेकरून अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील लोकांना त्याचा लाभ लवकर घेता येईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असेही सना मलिक शेख यांनी सांगितले.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री आमदार नवाब मलिक आणि त्यांची मुलगी सना मलिक शेख यांच्या प्रयत्नांना ४० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर यश ; कब्रस्तान, स्मशानभूमी, शाळा आणि हॉस्पिटलसारख्या महत्त्वाच्या विकासकामांना मिळाली मंजुरी"

Leave a comment

Your email address will not be published.


*