जनसन्मान यात्रेला पाच दिवसात अभूतपूर्व प्रतिसाद ; महिलांची उपस्थिती लक्षणीय…
मुंबई दि. १३ ऑगस्ट (जीपीएन,वार्ताहर) – राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वातंत्र्य दिनी ‘संविधान वाचन’ असा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या मुख्य कार्यालयात व प्रत्येक जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणानंतर साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.
लोकसभा निवडणुकीत संविधानाबाबत प्रश्न निर्माण करण्यात आला होता. देशाचे संविधान हा देशाचा आत्मा आहे… धर्मनिरपेक्ष विचारधारेवर, नीतीमत्तेवर आम्हा सर्वांचा ठाम असा विश्वास आहे. आणि हा ठाम विश्वास असल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने हा संदेश संबंध राज्यात देण्यासाठी तशाप्रकारची प्रस्तावना मोहीम राबवणार आहोत असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
सर्वधर्मियांचा हा देश आहे… गीता… रामायण… बायबल… कुराण.. जसे प्रिय आहे तसेच आम्हा भारतीयांना संविधान प्रिय आहे आणि म्हणूनच अजितदादांच्या नेतृत्वाखाली दिनांक १५ ऑगस्ट रोजी सामुदायिक संविधान वाचन करणार आहोत असे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे, मी प्रदेश कार्यालयात, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल गोंदियामध्ये, नाशिकमध्ये ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, आणि सर्व वरीष्ठ नेते, मंत्री, आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष हे संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करतील असेही स्पष्ट केले.
आम्ही लोकसभेला जाहिरनामा प्रसिद्ध केला त्या जाहिरनामाच्या पहिल्या पेजवर संविधान प्रस्तावना मांडली होती. शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारधारेवर… ध्येयधोरणांवर… सिध्दांतावर विश्वास ठेवत आम्ही राजकीय वाटचाल करत आहोत. ती अधिक दृढ करण्याचा आगळावेगळा प्रयत्न, संविधान उपक्रम या स्वातंत्र्यदिनी राबवत आहोत हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.
जनसन्मान यात्रा राज्यात दिनांक ८ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली. सलग पाच दिवस ही यात्रा करण्यात आली. ही यात्रा पहिल्या दिवशी दिंडोरी, देवळाली, दुसर्या दिवशी निफाड येवला, तिसऱ्या दिवशी सिन्नर, कोपरगाव, चौथ्या दिवशी धुळे शहर, जिल्हा, अमळनेर याठिकाणी गेली. या ऐतिहासिक जनसन्मान यात्रेला अभूतपूर्व प्रचंड असा प्रतिसाद जनतेचा मिळाला. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदी उपस्थित होते.
Be the first to comment on "राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनी ‘संविधान वाचन’ उपक्रम राबवणार – सुनिल तटकरे"