सणासुदीच्या हंगामात उत्सवासाठी कर्ज घेण्यापूर्वी विचारात घेतल्या पाहिजेत अशा पाच बाबी नीरज धवन, कंट्री मॅनेजर, एक्सपीरियन इंडिया

Experian India Logo

मुंबई, 18 ऑक्टोबर 2022 (GPN):- भारतात वर्षभर कोणते ना कोणते सण साजरे केले जात असले, तरी खऱ्या अर्थाने भारतीय सणासुदीचा हंगाम ऑगस्ट/सप्टेंबरमध्ये सुरू होतो आणि डिसेंबरच्या अखेरीस नववर्षाचे स्वागत करून त्याची सांगता होते. अनेक जण घर, कार किंवा अन्य काही महागड्या ग्राहकोपयोगी वस्तूंसारखी महत्त्वाची खरेदी या काळात करण्याचे बेत आखतात, कारण या काळातील खरेदी शुभ समजली जाते. त्याचप्रमाणे ब्रॅण्डसही या काळात सवलतींची घोषणा करतात. सणासुदीच्या काळात कर्जाची मागणीही वाढते असे कर्जदात्या संस्थांचे निरीक्षण आहे.

कर्ज ही एक जबाबदारी असते. तुम्ही जेव्हा कर्ज घेण्याचा पर्याय निवडता तेव्हा त्याची परतफेड वेळेत होईल याची खात्री करणे आवश्यक असते, जेणेकरून तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ नये. खरे तर तुम्ही कर्ज घेतले आणि जबाबदारीने त्याची परतफेड केली, तर तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्याची ती उत्तम संधी ठरते. सणासुदीसाठी कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही विचारात घेतल्या पाहिजेत अशा या पाच बाबी:-

०१: बजेटची व्यवस्थित आखणी करा:-

अवतीभवती सणासुदीचे उत्सवी वातावरण असताना, वाहावत जाऊन आपल्या उत्पन्नाहून अधिक खर्च केला जाण्याची शक्यता दाट असते. म्हणूनच, तुम्ही या काळात ज्या खर्चाचे नियोजन केले आहे, त्याचे व्यवस्थित बजेट तयार करणे महत्त्वाचे आहे. अगदी तुम्ही खरेदीसाठी कर्ज घेण्याचे नियोजन करत असाल, तरीही तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार तुम्ही जास्तीत-जास्त किती रकमेचे कर्ज घेऊ शकता याचा विचार करा. सणासुदीच्या आनंदात मग्न होतानाच खर्चाबाबत जबाबदारीचा दृष्टिकोन ठेवा.

०२: तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नियमित लक्ष ठेवा:-

नीरज धवन, कंट्री मॅनेजर, एक्सपीरियन इंडिया ह्याच्या मते सणासुदीच्या काळात कर्ज घेऊन काही खरेदी करण्याचा बेत तुम्ही आखत असला, तर चांगला क्रेडिट स्कोअर राखण्यासाठी किंवा त्यात सुधारणा करण्यासाठी आधीपासूनच प्रयत्न करणे उत्तम ठरेल. क्रेडिट स्कोअर तत्काळ तपासला जाऊ शकतो. कर्जदाते कर्ज मंजूर करण्यापूर्वी तुमचा कर्ज परतफेडीचा इतिहास व क्रेडिट स्कोअर यांचे परीक्षण करतात. साधारणपणे ७५०हून अधिक चांगला क्रेडिट स्कोअर बहुतेक कर्जदाते चांगला समजतात. जर तुमचा स्कोअर याहून कमी असेल तर तुम्ही कर्जांची परतफेड करून आणि कर्जाचे हप्ते चुकणार नाहीत याची काळजी घेऊन त्यात सुधारणा करू शकता. अल्पावधीत एकाहून अधिक कर्जांसाठी अर्ज करणेही टाळले पाहिजे, कारण याचा स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो.

०३कर्जाच्या पर्यायांतून चातुर्याने योग्य निवड करा:-

तुम्हाला जर महागडा टेलीव्हिजन संच खरेदी करायचा असेल, तर क्रेडिट कार्ड स्वाइप करण्याऐवजी किंवा व्यक्तिगत (पर्सनल) कर्ज घेण्याऐवजी ग्राहकोपयोगी वस्तू कर्ज (कंझ्युमर ड्युरेबल लोन) घेणे कदाचित अधिक फायदेशीर ठरेल. तुमच्या खरेदीसाठी उपलब्ध असलेल्या कर्जाच्या सर्व पर्यायांचे मूल्यमापन करा आणि सुविधा व व्याजदरांची तुलना करून सर्वोत्तम कर्जाचा पर्याय शोधा. याशिवाय, कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी स्वत:चा क्रेडिट स्कोअर तपासून बघायला विसरू नका, कारण त्यामुळे तुमच्या क्रेडिट प्रोफाइलचे चित्र तुमच्या डोळ्यापुढे स्पष्ट असेल आणि तुम्ही सर्वांत अनुकूल कर्ज व योजनांचा पर्याय निवडू शकाल.

०४कर्जाच्या अटी व नियम संपूर्णपणे वाचा:-

सणासुदीच्या काळात अनेक बँका व वित्तीय संस्था अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी विशेष कर्ज योजना जाहीर करतात. अशा कोणत्याही योजनेद्वारे कर्ज घेण्यापूर्वी नियम व अटी पूर्णपणे वाचण्यास कधीही विसरू नका. लोकांनी बारीक अक्षरांत छापलेला मजकूरच वाचला नाही आणि हिशेबाहून अधिक परतफेड त्यांना करावी लागली अशी बरीच उदाहरणे आहेत. त्यामुळेच सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा आणि कर्जाबद्दलचे सर्व मुद्दे समजावून घेतल्यानंतरच ऑफर/कर्जावर स्वाक्षरी करा

०५: ईएमआय कधीच चुकवू नका:-

तुम्ही एखादे उत्पादन खरेदी करण्यासाठी कर्जाचा पर्याय स्वीकारता तेव्हा या खरेदीतून तुम्हाला ज्याप्रमाणे आनंद मिळतो, त्याचप्रमाणे पुढील काही महिने किंवा वर्षे दर महिन्याला ठराविक रकमेची परतफेड करावी लागणार आहे हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे करू शकला नाहीत तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे भविष्यकाळात कर्ज मिळणे कठीण होऊन बसेल. म्हणूनच तुम्हाला तुमच्या परतफेडीच्या क्षमतेविषयी आत्मविश्वास असेल तरच कर्ज घ्या आणि एकही ईएमआय चुकवू नका.

सारांश

भारतात सणासुदीच्या हंगामाचा संबंध संपत्ती, निर्मिती व समृद्धीशी जोडला जातो. सणासुदीच्या काळात अनेक कर्जवितरण संस्था कस्टमाइझ्ड कर्जे देऊ करतात. तुम्हाला एखादी महागडी खरेदी करायची असेल आणि सणासुदीसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या ऑफर्सचा लाभ घेण्याची इच्छा असेल, तर वर स्पष्ट केलेले मुद्दे लक्षात ठेवा आणि त्यानुसारच कर्ज घ्या. सणासुदीच्या काळात फसवणूक करणारेही सक्रिय होतात, हे विसरू नका. केवळ नामांकित व आरबीआयची मंजुरी असलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "सणासुदीच्या हंगामात उत्सवासाठी कर्ज घेण्यापूर्वी विचारात घेतल्या पाहिजेत अशा पाच बाबी नीरज धवन, कंट्री मॅनेजर, एक्सपीरियन इंडिया"

Leave a comment

Your email address will not be published.


*