अक्षयपात्रचे देशातील ६२वे युनिट २८२ शाळांमधील १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना सेवा देण्यास फाउंडेशन सज्ज
मुंबई, ८ जुलै २०२२ (GPN): ‘अक्षयपात्र फाउंडेशन’ च्या नवीन स्वयंपाकघराचे (किचन) उद्घाटन आज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. ‘वेस्टब्रिज कॅपिटल’ या कंपनीच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेले हे अत्याधुनिक केंद्रीकृत स्वयंपाकघर सुमारे ३ एकर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. अक्षयपात्रचे हे देशातील ६२ वे आणि उत्तर प्रदेश राज्यातील पाचवे स्वयंपाकघर आहे. या फाउंडेशनतर्फे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेद्वारे (पीएम पोषण – पूर्वीची ‘मिड-डे मील’ (एडीएम) योजना) एक लाखाहून अधिक मुलांना नियमित पोषक आहार देण्यात येणार आहे. ‘अक्षयपात्र’ च्या या नव्या किचनच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे होते, तर राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे विशेष अतिथी होते. यावेळी अक्षयपात्रचे अध्यक्ष मधु पंडित दासा आणि उपाध्यक्ष चंचलपती दासा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर स्वयंपाकघरातील सुविधांचा फेरफटका आणि मुलांना प्रतीकात्मक जेवण हाही कार्यक्रम घेण्यात आला. पोषण आहार योजनेच्या माध्यमातून देशातील भूक व कुपोषण दूर करण्यासाठी अक्षयापात्र करीत असलेल्या प्रयत्नांची उपस्थित मान्यवरांनी निःसंदिग्धपणे प्रशंसा केली आणि संस्थेच्या उपक्रमाला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
अक्षयपात्र किचनचे उदघाटन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मला आज माध्यान्ह भोजन योजनेसाठी (पीएम पोषण) केंद्रीकृत स्वयंपाकघराचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली. या सोहळ्यादरम्यान, मला माझ्या वाराणसी शहरातील सरकारी शाळेमधील काही १०-१२ वर्षांच्या मुलांशी संवाद साधण्याचीही संधी मिळाली. पुढच्या वेळी मी वाराणसीला येईन, तेव्हा मला या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांना भेटायला हवे. मी फक्त १५ मिनिटांसाठी त्यांच्यासोबत होतो; पण या मुलांमधील प्रतिभा, त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास आणि त्यांना अवगत असलेली विविध कौशल्ये, यांमुळे मी भारावून गेलो. ही मुले सामान्य कुटुंबातील आहेत व ती सरकारी शाळेत शिकतात, ही बाब येथे अगदी नगण्य ठरते.”
मधु पंडित दासा, अध्यक्ष, अक्षयपात्र फाऊंडेशन यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली ते म्हणाले, “वाराणसीमध्ये आमच्या नवीन स्वयंपाकघराचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढला, याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. या सोहळ्याला शुभेच्छा दिल्याबद्दल राज्यपाल आनंदीबेन पटेल व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही मला आभार मानायचे आहेत. आज आम्ही उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्याने आणखी एक अध्याय लिहित आहोत. वाराणसीच्या मुलांची सेवा करण्याच्या या संधीबद्दल आम्ही सरकारचे अत्यंत आभारी आहोत. प्रशासनाच्या विविध विकासात्मक कार्यक्रमांना व योजनांना पाठिंबा देण्याच्या कटिबद्धतेचा आम्ही या ठिकाणी पुनरुच्चार करीत आहोत. या स्वयंपाकघराचे प्रायोजकत्व घेतल्याबद्दल आणि त्यातून विद्यार्थ्यांची भूक भागविण्याच्या आमच्या प्रयत्नांना पाठिंबा दिल्याबद्दल मी ‘वेस्टब्रिज कॅपिटल’चे सह-संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक संदीप सिंघल आणि त्यांच्या पथकाचेही आभार मानू इच्छितो.”
Be the first to comment on "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अक्षयपात्र’ च्या नवीन स्वयंपाकघराचे लोकार्पण"