देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रि की सुपर मुख्यमंत्री हे काळ ठरवेल

मुंबई, १ जुलै, २०२२ (GPN): एकनाथ शिंदेंना
मुख्यमंत्री पद मिळाल्याने आम्हाला सुखद धक्का बसला आहे. हे पंतप्रधान मोदी, शहा, नड्डा आणि देवेंद्र फडणवीसांमुळे झाले आहे. फडणवीसांनी सत्तेचा त्याग केला, उद्धव ठाकरे हो मोठे नेते आहेत, त्यांना वेळ आल्यावर उत्तर देऊ, अशा शब्दांत शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी गेल्या दोन दिवसांतील घडामोडींची माहिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपद घेण्यास फारसे उत्सुक नव्हते अशी त्यांची देहबोली सांगत होती. हे खरे असले तरी भाजप पक्षनेतृत्वाचे यामागे भविष्यातील काही आडाखे आहेत. भाजपने अनपेक्षिपणे एकनाथ शिंदे यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवून महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी कलाटणी दिली आहे. मात्र त्याचवेळी प्रशासनावर भाजपचा वचक राहावा, यासाठी देवेंद्र फडणवीस यांची मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून वर्णी लावली आहे. मुख्यमंत्रिपद भोगल्यावर उपमुख्यमंत्रिपद कसे घ्यावे, हा देवेंद्र यांच्यापुढे प्रश्न होता. त्यामुळे त्यांनी स्वतःहून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. मात्र त्यासाठी पक्षनेतृत्व तयार झाले नाही.

वास्तविक देवेंद्र फडणवीस एक कुशल राजकारणी आहेत. नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत त्यांनी याचा परिचय दिला आहे. प्रशासनावर तितकीच चांगली पकड आहे. २०१४ ते २०१९ या काळातील आपल्या राजवटीत त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी आपल्या या कारकिर्दीत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या मागील १५ वर्षाच्या राजवटीतील कागदावर असणारे अनेक प्रकल्प प्रत्यक्षात उतरवले. शिवडी- न्हावाशेवा ट्रान्सहार्बर हे त्याचे मोठे उदाहरण आहे. याशिवाय मुंबईतील मेट्रो, नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ या प्रकल्पांना त्यांनी गती दिली. मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाच्या कल्पनेला त्यांनी मूर्त स्वरूप दिले. मुंबई- नवी मुंबईला जोडणारा वाशी येथील तिसरा पूल यासारखे अनेक प्रकल्प त्यांनी सुरू केले. मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पांचा वेग मंदावला. २०२४च्या निवडणुकांना सामोरे जाताना हे प्रकल्प पूर्ण होणे भाजपच्या दृष्टीने तितकेच महत्वाचे आहे. कारण या प्रकल्पांवर भाजपची छाप आहे.

काल फडणवीस यांनी मेट्रो कार शेड ही आरेमध्येच उभारण्यात येणार असल्याचे म्हटले होते. २५ टक्के जिथे काम झाले आहेत तिथेच मेट्रो कारशेड पूर्ण करणे मुंबईच्या हिताचे असल्याचे ते म्हणाले. यावरून ठाकरेंनी त्रास द्यायचा असेल तर मला द्या, मुंबईवर राग काढू नका, असा आरोप केला होता.

हे प्रकल्प वेळेत पूर्ण होणे आवश्यक असेल तर फडणवीस मंत्रिमंडळात असणे तितकेच गरजेचेआहे. त्यामुळेच पक्षनेतृत्वाने मंत्रिमंडळात समाविष्ट होण्याबाबत त्यांच्यावर दबाव टाकला, असे अधोरेखित होते. अन्यथा चंद्रकांत पाटील किंवा सुधीर मुनगंटीवार ही नावे उपमुख्यमंत्रिपदासाठी होती. मात्र त्यांच्या तितका प्रभाव जाणवला नसता. शिवसेनेला शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे ही भाजपची राजकीय खेळी असली तरी प्रशासनावर भाजपचीच पकड राहावी, याची देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आली आहे. हे एका रणनीतीचा भाग आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात अजित पवार जसे सुपर मुख्यमंत्री म्हणून वावरताना पाहायला मिळाले, तसे देवेंद्र या सरकारमध्ये पाहायला मिळाले, तर नवल वाटायला नको.

खरे पाहिले तर हे सरकार अस्तित्वात आणण्यात देवेंद्र यांचीच मुख्य भूमिका आहे. त्यांचा या सर्व मिशनमध्ये प्रत्यक्ष सहभाग राहिलेला आहे, हे लपून राहिलेले नाही. केंद्रीय नेतृत्व केवळ मार्गदर्शकाच्या भूमिकेत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्विकारल्यामुळे त्यांची अवनती झाली असा त्यातून अर्थ काढणे चुकीचे ठरेल. भाजपने महाराष्ट्राच्या दूरगामी राजकारणाची पद्धतशीरपणे केलेली आखणी आहे, याचा पुढे उलगडा होईलच.

सन २००४ मध्ये राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा असूनही त्यांनी मुख्यमंत्रिपद काँग्रेसला देऊ केले होते. हा राष्ट्रवादीच्या व्युव्हरचनेचा भाग होता. त्याचे राष्ट्रवादीला कधीच नुकसान झाले नाही. त्या मोबदल्यात अधिकची आणि महत्वाची खाती पदरात पडून घेतली. विशेषतः लोकांशी थेट संपर्क येणारे खाती घेण्यावर त्यांनी भर दिला. परिणामी त्यांनी काँग्रेसपेक्षा राज्यात आपला पक्ष बळकट केला. राष्ट्रवादीचे एक पाऊल मागे घेण्यामागे राज्यात स्वबळावर सत्ता आणणे हेच ध्येय होते. अर्थात ते अद्यापतरी पूर्णत्वास येऊ शकले नाही, हा भाग वेगळा! भाजप मात्र महत्वाकांक्षा असलेला पक्ष आहे. २०२४ मध्ये त्यांना कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर सत्ता आणायची आहे. त्याच्याच दृष्टीने टाकलेले हे पाऊल आहे. झेप घेण्यासाठी काही पाऊले मागे यावे लागते, याचाच प्रत्यय भाजपच्या बाबतीत पुढील काही वर्षात आलेला असेल आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचीच मोठी आणि महत्वपूर्ण भूमिका असेलेली पाहायला मिळेल. सद्यस्थितीत शिंदे सरकारच्या गाडीचे स्टेअरिंग मात्र फडणवीसांच्या हाती असणार एवढे मात्र निश्चित !

 

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रि की सुपर मुख्यमंत्री हे काळ ठरवेल"

Leave a comment

Your email address will not be published.


*