‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त स्टोरीटेलचे सर्वांना शुभेच्छा देणारे ‘मराठी भाषा गौरवगीत’! डिजीटल तंत्रज्ञानामुळे जगभर पोहचते आहे मराठी…!! – प्रसाद मिरासदार

(GPN): रविवार दिनांक २७ फेब्रूवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने ‘स्टोरीटेल’ प्रकाशित करत आहे सुप्रसिध्द लेखक वि.ग.कानिटकर लिखित ‘दर्शन ज्ञानेश्वरी’. ‘मराठिचिया बोलू कौतुके.. अमृताते पैजा जिंके’ अशी मायमराठीची थोरवी सांगणा-या संत ज्ञानेश्वरांच्या स्मरणानेच ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा व्हायला हवा. कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने मराठी भाषेचे वैभव वाढवण्यासाठी आणि जोपासण्यासाठी डिजीटल युगात काय प्रयत्न करता येतील हे पहाणे गरजेचे आहे.

स्वातंत्र्यानंतरची दोन दशके संपूर्ण भारतात नवनविन गोष्टी घडत होत्या. साठ आणि सत्तरच्या दशकात मराठी साहित्याचा सुवर्णकाळ होता असे मानले जाते. या काळात साहित्य, नाट्य, चित्रपट आदी सर्वच कलांमध्ये वेगवेगळे प्रयोग होत होते. विशेषतः नवकथा, कविता, कादंबरी लेखनाला नवे धुमारे फुटत होते. सर्वच स्तरातील लेखक साहित्य निर्मिती करत होते आणि त्यास मराठी वाचकांचा प्रतिसादही मिळत होता. गावोगावी सरकारी आणि खाजगी ग्रंथालयांचे मोठे जाळे निर्माण झाले होते आणि या वाचनालयातून लोकप्रिय तसेच अभिजात साहित्य वाचत नवी पिढी तयार होत होती. अनेक विषयांवरची, मासिके, साप्ताहिके, दिवाळी अंक प्रकाशित होत होती. नवेनवे प्रकाशक पुढे येत होते. पुस्तके सर्वसामान्यांपर्यंत खेडोपाडी पोहचवण्यासाठी वाचक चळवळी निर्माण होत होत्या. पुस्तक प्रदर्शने आयोजित केली जात होती. अशा सांस्कृतिक उपक्रमांच्या बहरीचा काळ होता.

पण ऐंशी आणि नव्वदीच्या दशकात अर्थकारणाचे महत्व वाढले. नव्वद साली भारतीय अर्थव्यवस्था खुली झाल्यावर शिक्षणात कला शाखेपेक्षा वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्राला महत्व आलं आणि इंग्रजी भाषेने नव्या पिढीचे विश्व व्यापून गेलं. इंग्रजी माध्यमांच्या शाळा मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ लागल्या आणि मराठी माध्यमातील शाळांची दयनीय अवस्था झाली. नव्या पिढीला मराठी वाचता येईना, मराठी भाषा टिकेल की नाही असा सूर येऊ लागला. याच काळात दोन हजार सालानंतर तंत्रज्ञानाचा जोर सर्वच क्षेत्रात वाढला. संगणकीकरण आणि डिजीटल तंत्रज्ञानाने प्रत्येकाच्या हातातल्या मोबाईलवर सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध होऊ लागले. आणि सर्वच जगात प्रादेशिक भाषांचे महत्व पुन्हा वाढू लागले. कमीतकमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचायचे असेल तर आपले साहित्य फक्त इंग्रजीत प्रकाशित न करता सर्वसामान्यांच्या भाषेत लिहिले पाहिजे हे जाणवू लागले. पुस्तकांप्रमाणेच टि.व्ही., चित्रपट आणि डिजीटल साहित्य निर्मिती स्थानिक भाषेत होऊ लागली. जगभरातील लोक एकमेकांशी व्यवसाय इंग्रजीतून करू लागली तर स्थानिक व्यवहार, सांस्कृतिक आदान प्रदान आपल्या स्वतःच्या भाषेत करू लागली आहेत. यातून ‘ग्लोकल’ संकल्पना पुढे आले. एका प्रकारे सर्वसामान्य माणसांना जागतिक भान आले. स्थानिक भाषेतून कथा, कविता, नाटके, सिनेमे, कादंब-यांची मागणी वाढत असल्याने डिजीटल जगात ‘रिजनल कंटेट’ किंवा स्थानिक साहित्याला मागणी वाढली.

नव्या तंत्रज्ञानामुळे ‘ओटिटी’ प्लॅटफार्मस वाढले. ‘युट्यूब’, ‘फेसबुक’सारखी व्यासपीठं प्रत्येकाला मोफत व्यक्त व्हायला उपलब्ध झाली. ‘स्टोरीटेल’सारखे ‘ऑडिओ ओटिटी’ प्लॅटफार्मस निर्माण झाले. स्क्रिनचा वापर वाढल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो या पासुन बचावासाठी ध्वनी माध्यमामधून पुस्तके, कथा, कविता, नाटके ऐकण्याचा कल वाढू लागला. ऑडिओमध्ये स्वतंत्र प्रयोग होऊ लागले. खास ऑडिओसाठी लेखन करून त्यानंतर कादंब-यात रूपांतर करणे सुरू झाले. थोडक्यात, जग ऐकू लागले!

२०१७  नंतर स्टोरीटेलने मराठीत पहिल्यांदा ऑडिओबुक्सची संस्कृती आणली. मराठी जनता आपल्या मोबाईलवर नामवंतांचे साहित्य ऐकू लागली. मराठी साहित्य जगभरात कुठेही ऐकता येऊ लागल्याने परदेशातही मोठ्या प्रमाणावर इथले साहित्य ऐकले जाऊ लागले. गेल्या पाच वर्षात स्टोरीटेलने मराठी साहित्यविश्वात एक प्रकारे क्रांतीच केली. स्टोरीटेलवर सर्व भारतीय भाषा आणि इंग्रजी मिळून तीन लाखांहून अधिक ऑडिओबुक्स आणि ईबुक्स आहेत. मराठीत पाच हजारांहून अधिक ऑडिओबुक्स आहेत. हा सर्व खजिना अतिशय कमी काळात म्हणजे फक्त तीन वर्षात स्टोरीटेलच्या मराठी टीमने निर्माण केला आहे. आता कुठेही, कधीही आणि कितीही मराठी ऑडिओबुक्स ऐकण्याची सोय स्टोरीटेलमुळे झाली आहे. तुमच्या मोबाईलवर संपूर्ण ग्रंथालय घेऊन हिंडण्याचे सामर्थ्य या उपक्रमामुळे साध्य झालं आहे. कोणतीही भाषा आपण ऐकत ऐकतच शिकतो. त्यानंतर बोलू लागतो आणि मग वाचू आणि लिहू लागतो. मराठी भाषा जगभरातील लोक मोठ्या प्रमाणावर ऐकत आहेत. संत ज्ञानेश्वरांनी आरंभलेला वाड्यज्ञ आणि मागितलेले पसायदान नव्या डिजीटल युगामुळे संपूर्ण विश्वात पोहचते आहे. हीच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साजरी करण्याची गोष्ट आहे.

स्टोरीटेलने ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून, जगभरातील सर्वांना शुभेच्छा देणारे ‘मराठी भाषा गौरवगीत’ तयार केले आहे. हे गीत आपण स्टोरीटेलच्या युट्युब चैनलवर ऐकू शकता आणि तुम्हाला आवडल्यास जरूर तुमच्या सोशल मीडिया हैंडल्सवरून शेअर करू शकता, अभिजात मराठी ऑडिओबुक्स अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन या गीताचे गीतकार प्रसाद मिरासदार यांनी स्टोरीटेलच्यावतीने जाहीर केले आहे. या गीताला संगीत दिवंगत संगीतकार नरेंद्र भिडे यांनी दिले असून गायक यश गोखले आहेत.

श्री. वि. ग. कानिटकर लिखित “दर्शन-ज्ञानेश्वरी”ऐकण्यासाठील लिंक

https://www.storytel.com/in/en/books/darshan-dnyaneshwari-1574553Ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त स्टोरीटेलचे सर्वांना शुभेच्छा देणारे ‘मराठी भाषा गौरवगीत’! डिजीटल तंत्रज्ञानामुळे जगभर पोहचते आहे मराठी…!! – प्रसाद मिरासदार"

Leave a comment

Your email address will not be published.


*