MUMBAI (GPN): मॅगसेसे पुरस्कार प्राप्त प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे यांचे प्रकाशवाटा हे आत्मचरित्र मराठी साहित्य विश्वात खूपच लोकप्रिय आहे. तरूणांना प्रेरणादायी ठरलेले हे आत्मचरित्र स्टोरीटेल वर रविवार दिनांक २६ डिसेंबर या प्रकाश आमटे यांच्या जन्मदिनी प्रकाशित होत आहे. सुप्रसिध्द अभिनेते सचिन खेडेकर यांनी मूळ मराठी प्रकाशवाटा वाचले आहे. याशिवाय, प्रकाशवाटाचे इंग्रजी आणि हिंदी अनुवादही ऑडिओबुक स्वरूपात स्टोरीटेलवर उपलब्ध आहेत.
प्रकाश आमटे म्हणतात, “आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी, असं बाबांच्या मनात होतं. या कामाची जबाबदारी मी घेतली आणि सर्वांनी मिळून ती पार पाडली. बाबांचं हे स्वप्न हेमकलशात प्रत्यक्षात कसं उतरतंय, त्याची ही गोष्ट! म्हटली तर माझ्याही जीवनाची गोष्ट.” सामाजिक कार्यासाठी ‘रेमन मॅगसेसे’ हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार ज्यांना देण्यात आला, त्या डॉ. प्रकाश आमटे यांनी साकार केलेल्या स्वप्नांची ही गोष्ट ‘प्रकाशवाटा’मध्ये शब्दबद्ध केली आहे. दुर्गम भागात गेली चार दशकं सुरु असलेल्या नि:स्वार्थ कामाची ही ओळख संस्मरणीय तर ठरतेच पण आबालवृद्धांना प्रेरणाही देते.
प्रकाशवाटा’ हे डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांच्या हेमलकसाच्या ‘लोकबिरादरी प्रकल्पा’तल्या अनुभवांवर लिहिलेले पुस्तक आहे. डॉ. बाबा आमटेंचे समाजकार्य अविरत पुढे चालू ठेवताना त्यांची दोन मुले डॉ. प्रकाश आणि डॉ. विकास यांनी आपले आयुष्य देखील त्यांच्या या कार्यासाठी वाहिले. अशाच एका कामाची लोकविलक्षण कहाणी म्हणजे “प्रकाशवाटा”. हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पावर काम करत असताना आलेले अविस्मरणीय अनुभव आणि आलेल्या संकटांवर केलेली मात यांची थरारक कथा या पुस्तकातून वाचायला मिळते. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडच्या दुर्गम भागात ‘माडिया-गोंड’ ही कशीबशी लाज झाकावी एवढीच कपडे वापरणारी अतिशय मागासलेली जमात वास्तव्य करून आहे. अंगभर कपडे घातलेला माणूस बघून घाबरून दूरवर जंगलात पळून जाणारे हे आदिवासी भूक, रोगराई, अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेले या कथेतून अनुभवायला मिळतात.
ध्येयवेड्या वृत्तीच्या डॉ. बाबा आमटेंनी अशा या दुर्गम भागात प्रकल्प उभारण्याचे ठरवले. वयाच्या साठाव्या वर्षीची बाबांची जिगर पाहून डॉ. प्रकाश यांनी तत्काळ या प्रकल्पाची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कार्यात त्यांची नुकतेच लग्न करून आलेली पत्नी डॉ. मंदाताई देखील सामील झाल्या. “प्रकाशवाटा” मध्ये मनाला चटका लाऊन जाणारे अनेक प्रसंग आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीतून, जीवावर बेतणाऱ्या प्रसंगातून मार्ग काढत हेमलकशाला इस्पितळ, शाळा सुरु करणाऱ्या झपाटलेल्या लोकांची ही कहाणी आहे. बाबा आमटेंची ही चळवळ आता त्यांची तिसरी पिढी सांभाळत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक समर्थपणे हे काम पुढे सुरु आहे.
डॉ. प्रकाश आमटे यांचे प्रेरणादायी अनुभव ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू. १४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत रू.९९९/- आहे. पण आता नव्याने वार्षिक वर्गणी भरणा-यांसाठी स्टोरीटेलने अधिक सवलत जाहिर केली आहे आणि फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.
Be the first to comment on "डॉ. प्रकाश आमटे यांचे प्रेरणादायी ‘प्रकाशवाटा’ ऐका स्टोरीटेलवर!"