
From Left – Dr Haridas, Anesthesist, Dadasaheb Patil, Heart Transplant Specialist, Dr. Sanjeev Jadhav Cardiothoracic and Vascular Surgeon Apollo Hospital Navi Mumbai
Dr. Sanjeev Jadhav Cardiothoracic and Vascular Surgeon Apollo Hospital Navi Mumbai
लोअर परळ ते बेलापूरपर्यंत ‘ग्रीन कॉरिडोर’ची उभारणी – फक्त २५ मिनिटांत पार केले ४५ किमी अंतर
मुंबई, २८ सप्टेंबर २०२०: महाराष्ट्रातील सांगली येथे राहणारे ५६ वर्षांचे दादासाहेब पाटील यांच्यावर नवी मुंबईतील ‘अपोलो हॉस्पिटल’मध्ये हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. एका ३१ वर्षीय तरुणाच्या मृतदेहातून हे हृदय काढण्यात आले आणि प्रत्यारोपणाकरीता खास तयार केलेल्या ‘ग्रीन कॉरिडॉर’ द्वारे वेळ अजिबात न गमावता ते अपोलो हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मुंबईतील लोअर परळ ते नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल हे ४५ किलोमीटरचे अंतर पार पाडण्यात हॉस्पिटलच्या पथकाला अवघा २५ मिनिटांचा कालावधी लागला. हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाचे सर्जन डॉ. संजीव जाधव यांच्या नेतृत्वाखालील अपोलोच्या विशेष तज्ज्ञांच्या पथकाने ‘अपोलो हॉस्पिटल’ मध्ये पाटील यांच्यावर या हृदयाचे प्रत्यारोपण यशस्वीपणे केले. हा रुग्ण ‘इस्केमिक डायलेटेड कार्डिओमायोपॅथी’ ने ग्रस्त होता; याचा अर्थ, त्याच्या हृदयाची रक्ताभिसरणाची क्षमता कमी होती आणि त्यामुळे त्याची हृदयक्रिया बंद पडण्याच्या बेतात होती. नवीन ह्रदय बसवणे हाच या रुग्णाच्या आयुष्याची दोरी बळकट करण्याचा एकमेव मार्ग होता.
डॉ.संजीव जाधव हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाचे सर्जन, अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई म्हणाले, “हा रुग्ण आठ महिन्यांपूर्वी आमच्याकडे बायपास शस्त्रक्रियेसाठी आला. तपासणीदरम्यान असे आढळून आले की त्याच्या हृदयाचे कार्य केवळ २५ टक्के इतकेच सुरू होते. त्या काळात कोविड परिस्थितीमुळे शस्त्रक्रिया होऊ शकली नाही आणि त्याला परत आपल्या गावी सांगली येथे जावे लागले. पुढच्या काही महिन्यांत, त्याच्या हृदयाचे कार्य कमी होत गेले. संपूर्ण ‘लाइफ सपोर्ट सिस्टीम’ आणि हृदयाच्या आकुंचनाची शक्ती वाढवणाऱी औषधे (इनोट्रॉप) यांची त्यंतिक आवश्यकता असण्याच्या स्थितीत तो शेवटी आला. ‘हार्ट फेल्युअर’च्या घटना त्याच्या बाबतीत वारंवार होऊ लागल्या आणि प्रत्यारोपणाच्या आधी त्याला इतर काही रुग्णालयांमध्ये दाखलही करण्यात आले. ही काळाच्या विरूद्धची शर्यत होती. आम्हाला मुंबईतील रक्तदात्याबद्दल माहिती मिळाली, त्या वेळी ग्रीन कॉरिडॉर तातडीने कार्यान्वित करण्यात आला. दात्याचे हृदय काढून घेण्यात आले, ते ‘अपोलो हॉस्पिटल’मध्ये आणण्यात आले व त्याचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. हे एक वैज्ञानिक आव्हानदेखील होते. डॉक्टर आणि परिचारिका हे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत आणि रूग्णांचे आयुष्य वाचविण्यासाठी मोठी धडपड करीत आहेत. आम्हाला आनंद वाटतो की ही ह्रदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया समाधानकारक झाली व रुग्ण बरा झाला.’’
कार्डिओ थोरॅसिक व व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. शांतेश कौशिक, सीव्हीटीएस सर्जन डॉ. सचिन सणगर, सीव्हीटीएस डॉ. कमल सिंग, इन्टेन्व्हिस्ट डॉ. गुणाधर पधी, इन्टेन्व्हिस्ट डॉ. हरिदास मुंडे आणि इन्टेन्व्हिस्ट डॉ. सौरभ तिवारी या तज्ज्ञांच्या पथकाची डॉ. संजीव यांना साथ लाभली. ह्रदय प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया ९० मिनिटे चालली. त्यानंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात निरक्षणासाठी ठेवण्यात आले. ह्रदय प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांसाठी तेथे सुसज्ज असे खास बेड्स आहेत.
‘ग्रीन कॉरिडॉर’ हा रुग्णवाहिकेसाठी तयार करण्यात आलेला एक निश्चित मार्ग असतो. सर्व प्रकारच्या रहदारीपासून तो मुक्त ठेवण्यात आलेला असतो. अवयवदात्याकडून घेतलेला अवयव फार काळ बाहेर राहू शकत नसल्यामुळे, तो या रुग्णवाहिकेतून नेताना वाहतूक सिग्नल वा अन्य कोणतेही अडथळ्यांचा अडथळा येऊ नये आणि कमीत कमी वेळेत प्रत्यारोपण करावयाच्या रुग्णापर्यंत पोहोचावा, यासाठी विशेष नियोजन केले जाते.
अवयवदात्याकडून हृदय प्राप्त झालेले दादासाहेब पाटील म्हणाले, “पुण्यातील एका संभाव्य दात्याकडून प्रत्यारोपणासाठी अवयव मिळवण्याची संधी मी नुकतीच गमावली होती. हृदय निकामी झाल्याचे अनेक भोग मी भोगले असल्यामुळे माझ्यासाठी, ही काळाच्या विरोधातील लढाईच होती. नशीबाने आम्हाला एक हृदयदाता आढळला. प्रत्यारोपणाची संपूर्ण प्रक्रिया अतिशय सुरळीत पार पाडल्याबद्दल अपोलो हॉस्पिटलच्या पथकाचा मी आभारी आहे. मला आयुष्याची दुसरी संधी दिल्याबद्दल मी दात्याच्या कुटूंबाचा आणि डॉक्टरांचा ऋणी आहे.”
‘अपोलो हॉस्पिटल्स’ चे सीओओ आणि युनिट प्रमुख संतोष मराठे म्हणाले, “ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल व मदतीबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांच्यामुळेच हे प्रत्यारोपण यशस्वी होऊ शकले. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजारांचे प्रमाण देशात वाढत असल्याने, प्रतिबंधात्मक उपाय, त्वरीत निदान आणि उपचार करू शकण्याच्या मजबूत यंत्रणेची आपल्याला आवश्यकता आहे. तीन वर्षांच्या अल्प काळात, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई हे पश्चिम भारतातील सर्वात प्रगत प्रत्यारोपण केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले असून यकृत, मुत्राशय, हृदय आणि बोन मॅरो प्रत्यारोपण यांच्या शस्त्रक्रिया तज्ज्ञांच्या समर्पित पथकांद्वारे येथे करण्यात येत आहेत. आमच्याकडे एक अतिशय सक्षम क्लिनिकल पथक आहे. ते ‘हार्ट फेल्यूअर क्लिनिक’च्या माध्यमातून रूग्णांपर्यंत पोहोचते आणि अशा प्रकारच्या प्रकरणांसाठी अत्यंत जटिल अशी शस्त्रक्रियापूर्व व शस्त्रक्रियापश्चात उपचारप्रणाली राबवू शकते.”
Be the first to comment on "५६ वर्षीय दादासाहेब पाटील यांना मिळाले नवीन हृदय"