वसई-विरार रेल्वे स्थानकांत कोरोनाला लाल सिग्नल – रेल्वे स्थानकांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी पालिकेने कंबर कसली

IMG-20200322-WA0004Mumbai, 22 March, 2020: जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या साथीचा मुकाबला करण्याचा चंग वसई-विरार महापालिकेने बांधला आहे. मुंबई शहरात पाय पसरत असलेला कोरोना वसई विरार महापालिकेच्या हद्दीत रेल्वे मार्गाने शिरकाव करू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहेत. पालिकेच्या ‘नो कोरोना’ मोहिमेअंतर्गत रेल्वे स्थानकांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. सायंकाळी मुंबईत कामानिमित्त गेलेले शहरातील लोक घरी परतत असतात. त्यामुळे मुंबईतून कोरोनाचा विषाणू शहरात येऊ शकतो हे लक्षात घेऊन ही उपाययोजना करण्यात येत आहे.

वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत असलेली वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव ही चार प्रमुख स्थानकं आहेत. या स्थानकांमधून दर दिवशी लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यातच वसई येथे लांब पल्ल्याच्या गाड्याही थांबत असल्याने विषाणू संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे.

रेल्वे स्थानकांवरील गर्दी लक्षात घेऊनच वसई-विरार महापालिकेने रेल्वेकडे या स्थानकांचे निर्जंतुकीकरण करण्याची परवानगी मागितली होती. रेल्वेनेही ही परवानगी देत सहकार्य केले. पालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसह बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मदतीला घेत या चारही स्थानकांमधील प्रत्येकी चार अशा १६ प्लॅटफॉर्मच्या निर्जंतुकीकरणाचं काम हाती घेत ते पूर्ण केले आहे. स्थानकांमधील प्लॅटफॉर्मप्रमाणेच स्वच्छतागृहे, तिकीट खिडक्या, प्रतीक्षालये, पादचारी पूल येथेही निर्जंतुक रसायन फवारण्यात आले आहे.

मुंबई आणि आसपासच्या परिसरात रेल्वे हे मुख्य वाहतुकीचे साधन आहे. त्याचप्रमाणे संसर्गजन्य आजार सर्वदूर पसरवण्यातही रेल्वेचा हातभार मोठा असतो. नेमक्या याच गोष्टी लक्षात घेत स्थानकांचे निर्जंतुकीकरण करण्याची गरज आम्हाला लक्षात आली. आम्ही पालिकेतील अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनाही ही गोष्ट पटली. त्यातूनच हा उपक्रम राबवण्यात आला, असं स्थानिक आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केलं.

कोरोनाला अटकाव करण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. पण गर्दीच्या ठिकाणची स्वच्छता लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. रेल्वे स्थानकांमध्ये गर्दी खूप असते. त्यामुळे इथे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यायला हवी होती. सुदैवाने रेल्वेनेही उत्तम सहकार्य केले. पालिकेने हाती घेतलेल्या या उपक्रमाला आम्हीही सक्रीय पाठिंबा दिला. वसई-विरारमध्ये कोरोनाचा शिरकाव होणार नाही, यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं आमदार क्षितीज ठाकूर यांनी स्पष्ट केलं.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "वसई-विरार रेल्वे स्थानकांत कोरोनाला लाल सिग्नल – रेल्वे स्थानकांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी पालिकेने कंबर कसली"

Leave a comment

Your email address will not be published.


*